Belagavi

ऐन गणेशोत्सावाच्या तोंडावर बँकांचा संप: नागरिकांची आर्थिक कोंडी, सलग सुट्ट्यांमुळे हाल

Share

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच दुसरा शनिवार आणि रविवारी असलेल्या सलग सुट्ट्या लक्षात न घेता बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. आधीच वाढत्या महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना ऐन सणाच्या तोंडावर बँक व्यवहारांसाठी भटकंती करावी लागत आहे.

पाच दिवसांचा कार्यकाळ लागू करावा आणि पीएलआय (परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह) धोरणातील भेदभाव दूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने बँकिंग सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सरकारच्या दिरंगाईच्या धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज बेळगाव येथे बँक कर्मचाऱ्यांतर्फे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची परवानगी देण्यात यावी, या मुख्य मागणीला सरकारने दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही, असा आरोप युनियनचे अध्यक्ष मुरलीधर करजगी यांनी केला.

निषेध मोर्च्यादरम्यान बोलताना बँक ऑफ बडोदाचे प्रसन्न शेट्टी यांनी सांगितले की, पाच दिवसांची बँकिंग प्रणाली आणि पीएलआय धोरणातील असमानतेविरोधात हा लढा सुरू आहे. २०२४ मध्ये मंजुरी मिळूनही त्याची अंमलबजावणी न होणे आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी तर उच्च अधिकाऱ्यांना जास्त पीएलआय देणे पूर्णपणे अयोग्य आहे. सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. इतर आंदोलकांनीही ५ दिवसांचा कार्यकाळ आणि पीएलआयमधील भेदभाव त्वरित दूर करण्याची मागणी करत मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा थांबणार नसल्याचे स्पष्ट केले.

हा निषेध मोर्चा धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सुरू होऊन किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली मार्गे पुन्हा संभाजी चौकात येऊन समाप्त झाला.

Tags: