Belagavi

बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी कणकुंबी सीमेवर कारवाई

Share

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मालवाहू वाहनातून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी ४०० लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ही कारवाई गुरुवारी खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील कर्नाटक-गोवा सीमेवर करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कणकुंबी तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. गोव्यातून बेळगावकडे येणाऱ्या ६ चाकी मालवाहू वाहनाच्या मागील भागात विशेष कप्पा तयार करून ही दारू लपवण्यात आली होती. या प्रकरणी यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथील सिद्धप्पा मारुती बेळ्ळीकुंपी आणि सवदत्ती तालुक्यातील कडबी येथील मंजुनाथ हनमंतप्पा देसाई या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेली दारू आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे १० लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. खानापूरचे उत्पादन शुल्क निरीक्षक मल्लेश उप्पार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत उपनिरीक्षक नूरुल्ला खान, बाळगौडा पाटील तसेच कर्मचारी गुंडू पुजारी, बसवराज विवेकी, प्रकाश नंदीयवर आणि गृह रक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. खानापूर उत्पादन शुल्क ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.

Tags: