Khanapur

जांबोटीत ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’चे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते भूमिपूजन

Share

खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’च्या दोन मजली इमारतीचे भूमिपूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या आरोग्य योजनेअंतर्गत जांबोटी येथे ६५ लाख रुपये खर्चाच्या या सुसज्ज इमारतीच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आरोग्य केंद्र व रुग्णालय कार्यरत असणार आहे, तर पहिल्या मजल्यावर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय केली जाणार आहे. तालुक्यात एकूण सात आयुष्मान आरोग्य मंदिरांना मंजुरी मिळाली असून मोदेकोप, कुंभारडा, चापोली, तोलगी आणि गंदीगवाडसह विविध गावांमध्ये लवकरच कामे सुरू होतील, अशी माहिती आमदार हलगेकर यांनी दिली.

लहान-सहान उपचारांसाठी ग्रामीण भागातील लोकांना लांबच्या शहरांमध्ये पायपीट करावी लागू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे इमारत बांधकामात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या कडक सूचना आमदारांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसन्नवर, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

Tags: