Belagavi

बेळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल; बिलिंगच्या भोंगळ कारभाराचा फटका

Share

बेळगाव जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना सवलतीचा शिक्का आणण्यासाठी तासनतास फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे… छातीदुखीसारख्या गंभीर तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांनाही वेळेवर उपचार न मिळता ईसीजी कक्षाबाहेर ताटकळत राहावं लागतंय. नक्की कोणता गोंधळ सुरु आहे बीम्स मध्ये?? पाहुयात सविस्तर बातमीतून..

बेळगाव जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि बिलिंग कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे गरीब रुग्णांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निदर्शनात आली असून बीपीएल कार्डधारक आणि अनुसूचित जाती-जमातीच्या रुग्णांना सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी ओपीडी कक्षात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे तीव्र छातीदुखी असलेल्या रुग्णांना उपचारांअभावी तासनतास ताटकळत उभारण्याची वेळ आली आहे.

रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर सुरुवातीलाच मोफत किंवा सवलतीच्या नियमांची माहिती न देता, थेट बिलिंग काउंटरवर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना संबंधित ओपीडी विभागात शिक्का आणण्यासाठी पाठवले जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून रुग्ण परतेपर्यंत ईसीजी (ECG) कक्षातील कर्मचारी भोजनाच्या सुट्टीसाठी निघून जातात. परिणामी, तातडीच्या उपचारांची गरज असलेले रुग्ण तीव्र वेदना सहन करत ईसीजी कक्षाबाहेर ताटकळत बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वयोवृद्ध आणि तीव्र छातीदुखी असलेल्या रुग्णांना तासनतास ताटकळावे लागत असल्यामुळे एखादी अनर्थकारी घटना घडल्यास अथवा हृदयविकाराचा झटका आल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या कारभाराविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मा. जिल्हाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णांना सुरुवातीलाच मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: