बेळगाव येथील सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वडगाव परिसरातील कारभार गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत दिमाखात आणि विलोभनीय वातावरणात साजरा केला जात आहे.


शताब्दी महोत्सवानिमित्त संपूर्ण वडगाव परिसरामध्ये नयनरम्य व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईने उजळलेले रस्ते आणि आकर्षक मंडप भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. या वर्षी मुतगा येथील प्रसिद्ध मूर्तिकार एम. जी. पाटील यांनी साकारलेली १६ फूट उंच अत्यंत कलात्मक व भव्य गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली असून, मूर्तीचे दैवत्व आणि सौंदर्य पाहून भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.


श्रींच्या मूर्तीची भव्य आगमन मिरवणूक येळ्ळूर रोड क्रॉस येथून अत्यंत उत्साहात सुरू झाली. पिंपळ कट्टा आणि पाटील गल्ली मार्गे ही मिरवणूक कारभार गल्लीतील मंडपात पोहोचली. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि युवकांचा दांडिया व नृत्य यांमुळे संपूर्ण परिसर बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
या आगमन मिरवणुकीचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिक यल्लाप्पा कणबरकर, राम बाळेकुंद्री, फकिरा कुंडेकर, विजय येळ्ळूरकर आणि प्रकाश बाळेकुंद्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा शेकडो नागरिकांनी व महिलांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शताब्दी वर्षानिमित्त आगामी १० दिवसांत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Recent Comments