Belagavi

बेळगाव: जाधव नगरमधील श्री ब्रह्मदेव, नागदेव व करेम्मा मंदिराचा प्रथम वार्षिकोत्सव उत्साहात

Share

बेळगाव शहरातल्या जाधव नगरमधील प्राचीन श्री ब्रह्मदेव, नागदेव आणि करेम्मा देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव भाविकांनी अत्यंत श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा केला. वार्षिकोत्सव निमित्त आयोजित विशेष पूजा आणि महाप्रसाद महोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन देवाचे दर्शन घेतले.

बेळगाव शहरातील जाधव नगरमध्ये वसलेल्या अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या अत्यंत प्राचीन श्री ब्रह्मदेव, नागदेव आणि करेम्मा देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा सोहळा अत्यंत सडासराने पाळण्यात आला. या विशेष वार्षिकोत्सवानिमित्त सकाळपासूनच मंदिरात विशेष पूजा, महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

आजूबाजूच्या परिसरासह शहराच्या विविध भागांतून आलेल्या असंख्य भाविकांनी पूजेमध्ये सहभागी होऊन कृतार्थता व्यक्त केली. या धार्मिक समारंभात माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी महापौर सविता कांबळे, नगरसेवक संदीप जीरग्याळ आणि भाजपचे प्रमुख मुरूघेेंद्रगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाला सुरुवात करून दिली. मंदिराच्या बांधकामासाठी आणि जिर्णोद्धारासाठी पाच प्रमुख व्यक्ती व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली असून, पूर्वीपासून चालत आलेली महाप्रसादाची ही उत्तम परंपरा यशस्वीपणे पुढे चालवली जात असल्याचा आनंद मान्यवरांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारानंतर झालेला हा पहिला वार्षिकोत्सव सोहळा अतिशय दिमाखात यशस्वी झाला. महाप्रसादाची व्यवस्था चोख पार पाडणाऱ्या सर्वांचे आणि कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतलेल्या सर्व भाविकांचे मंदिर समितीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी बालाजी जाधव, शकुंतला जाधव, महेश सोलापूरकर, अनिल हुक्केरी, सतीश पाटील, संतोष शेट्टी, दीपक तरळे, योगेश तरळे, धनंजय, युवराज, शांता फडके, मनीषा यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Tags: