Khanapur

विवेकानंद महाविद्यालयात विद्यार्थी संसदेचा शपथविधी

Share

खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद पीयू महाविद्यालयात नवनिर्वाचित विद्यार्थी संसदेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उत्साहात पार पडला. यावेळी आमदारांनी महाविद्यालयासाठी पाच लाख रुपयांच्या निधीची घोषणा करत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले.

खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पीयू महाविद्यालयातील नवनिर्वाचित विद्यार्थी संसदेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा माणिकराव देशपांडे सभागृहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. चेतन मणेरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे असलेल्या खानापूरचे आमदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी आमदारांनी महाविद्यालयीन जीवन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत, व्यसन आणि गैरसवयींपासून दूर राहून एकाग्रतेने शिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. तसेच आमदार निधीतून महाविद्यालयाला पाच लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली.

अध्यक्षीय भाषणात ॲड. चेतन मणेरीकर यांनी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून शिक्षण घेऊन महाविद्यालयासह पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले.

प्राचार्य के. पी. चापगांवकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी, प्राध्यापक एस. एस. पाटील, उज्वला बाचोळकर, सुनीता लाड, संस्थेचे संचालक, महाविद्यालयातील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: