Khanapur

गुंजीजवळ एनएच-४ सर्व्हिस रोडवर ट्रक अन् टिपर अडकल्याने वाहतूक ठप्प

Share

खानापूर-लोंढा राष्ट्रीय महामार्ग-४ वरील गुंजीजवळ रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे सर्व्हिस रोडवर चिखलात ट्रक आणि टिपर अडकून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ठेकेदाराचे दुर्लक्ष तसेच खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या मौनाचा निषेध करत स्थानिकांनी त्वरित रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

खानापूर-लोंढा राष्ट्रीय महामार्ग-४ च्या गुंजी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असून, पावसामुळे पूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बुधवारी सर्व्हिस रोडवर एका बाजूला टिपर उलटण्याच्या स्थितीत अडकले, तर दुसऱ्या बाजूला मोठा ट्रक चिखलात रुतल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला. यामुळे दररोज या मार्गावरून ये-जा करणारे शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि वाहनधारकांना तासन् तास हाल सोसावे लागले. धोकादायक रीतीने मोठी वाहने अडकत असल्याने नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येबाबत ठेकेदाराला जाब विचारून कामाला गती देणे गरजेचे असताना, क्षेत्राचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कामाचा दर्जा आणि विलंब याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी. तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी युद्धपातळीवर सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करून कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

Tags: