Belagavi

कावेरी, म्हादयी, कृष्णा नदीच्या पाण्यावरून करवेचे आंदोलन

Share

कावेरी, म्हादयी आणि कृष्णा नदीचे पाणी अन्य राज्यांना सोडण्याच्या निर्णयाचा निषेध करत बेळगावात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी लोटांगण घालत आंदोलन केले.

बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात करवे कार्यकर्त्यांनी लोटांगण घालत तसेच रिकाम्या घागरी हातात घेऊन सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. माध्यमांसमोर पाणी सोडणार नसल्याचे सांगून प्रत्यक्षात तमिळनाडूकडे पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली. कर्नाटकाच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण न झाल्यास मुख्यमंत्र्यांना रिकाम्या घागरी आणि तांबे देऊन निषेध नोंदविण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

आंदोलक वाजिद हिरेकोडी यांनी कावेरी, म्हादयी आणि कृष्णा नदीचे पाणी हा कन्नडीगांचा हक्क असल्याचे सांगितले. नद्यांचे पाणी इतर राज्यांना देण्यात आल्यामुळे आज कन्नडीगांना रिकाम्या घागरी घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील पाण्याचे संरक्षण करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. अन्यथा मुख्यमंत्र्यांना रिकाम्या घागरी आणि तांबे देऊन निषेध व्यक्त करावा लागेल, असा इशारा वाजिद हिरेकोडी यांनी दिला.

आंदोलक महांतेश रणगट्टीमठ यांनी पाणी वाटपाच्या प्रश्नावर कर्नाटकवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. कन्नड संघटनांच्या महासंघाने १३ ऑगस्ट रोजी ‘कर्नाटक बंद’ची हाक दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील पाणी इतरत्र सोडण्याचा प्रकार थांबवण्यासाठी नागरिक आणि सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कन्नडपर संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: