Khanapur

खानापूर : मेरडा शाळेत शौचालयाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

Share

खानापूर तालुक्यातील मेरडा येथील शासकीय वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत शौचालयाची सुविधा नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मेरडा येथील शासकीय वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत शौचालयाअभावी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हायटेक शौचालयाच्या नावाखाली केवळ चार भिंती उभारून काम अपूर्ण सोडण्यात आले असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शौचासाठी घरी किंवा तलाव परिसरात जावे लागत आहे. शाळेतील बोअरवेलही बंद असून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची पाहणी करून माजी विद्यार्थी तथा ग्रामस्थ विष्णू पाटील यांनी शाळेची वस्तुस्थिती समोर आणली. ही बाब हलगा ग्रामपंचायतीचे पीडीओ निंगप्पा अक्सी यांच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन खानापूर तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच शाळेत शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: