Vijayapura

विजापूर: आलमट्टी धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर; उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना दिलासा

Share

महाराष्ट्राच्या पश्चिम घाट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकाची जीवन वाहिनी मानले जाणारे आलमट्टी धरण पूर्ण भरण्याच्या टप्प्यात पोहोचले आहे. कृष्णा नदीतील पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे धरणाची पाण्याची पातळी वेगाने वाढत असून, यामुळे उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आलमट्टी धरणाची कमाल क्षमता ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ५१८.५८ मीटरपर्यंत पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी आता अवघे १.०२ मीटर पाणी कमी आहे. सध्या धरणात ७३,१६२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, सुरक्षेचा उपाय म्हणून ४३,५६७ क्युसेक पाणी पात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह असाच राहिल्यास पुढील दोन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

आलमट्टी धरण भरत आल्याने विजापूर, बागलकोट, रायचूर आणि कलबुरगी या जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

– विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.

Tags: