विजापूर जिल्ह्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला असून, भूतनाळ नर्सरीच्या माध्यमातून नागरिकांना सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या रोपांचे वाटप केले जात आहे.

राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या विजापूर जिल्ह्यात वृक्षारोपण वाढवण्यासाठी प्रादेशिक वन विभागाने सवलतीच्या दरात रोपे देण्यास सुरुवात केली आहे. विजापूर शहराच्या वेशीवर असलेली भूतनाळ नर्सरी २६ एकर क्षेत्रात पसरली असून, १२ एकरांवर विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जाते.

“अरण्य विभागाने सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिल्याने विजापूर जिल्ह्यातील वृक्षारोपणाला मोठी चालना मिळाली असून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
अशी प्रतिक्रिया उत्तर कर्नाटक शेतकरी विकास संघाचे अध्यक्ष यासीन जवळी यांनी दिली.
या नर्सरीतून आंबा, जांभूळ, चिंच, चंदन, सागवान यांसह विविध प्रकारची फळझाडे आणि शोभेच्या रोपांचे संवर्धन करून वाटप केले जात आहे. रस्ता दुतर्फा वृक्षारोपण आणि वन जमिनीवरील लागवडीसाठीही येथूनच रोपे पुरवली जातात.”नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी शोभेची आणि विविध प्रजातींची रोपे तयार केली जात असून त्याचा चांगला उपयोग होत आहे.” असे प्रादेशिक वन विभागाच्या एसीएफ भाग्यवंती मसूदी यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विजापूर जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढण्यास मोठी मदत होत आहे. “शेतकरी आणि नागरिकांना अल्प दरात रोपे उपलब्ध करून देऊन जिल्ह्यात हरित उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.” असे प्रादेशिक वन विभागाचे उपसंरक्षक मल्लीनाथ कुसनाळ यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीकोटा, बाबळेश्वर आणि विजापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सवलतीच्या दरात ही रोपे दिली जात असून या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होत आहे.


Recent Comments