बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात येणाऱ्या सुतगट्टी घाटाजवळील परशानट्टी क्रॉस येथे काल रात्री बिबट्याचे दर्शन झाले. मुख्य रस्त्याच्या कडेला बिबट्या बसलेला दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या मार्गावरून जाणाऱ्या काही तरुणांनी बिबट्याचे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वीच हुक्केरी तालुक्यातील मावनूरजवळही वन विभागाने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले होते.

बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून, वन विभागाने तातडीने मोहीम राबवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. वन विभाग आणि पोलिसांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Recent Comments