Bailahongala

संपगाव :बस तुटवड्यामुळे शेकडो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील संपगाव गावात बसच्या तुटवड्यामुळे संतप्त शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अचानक रस्ता रोको आंदोलन केले.

तिगडी रस्त्यावरून परिसरातील अनेक गावांमधून शेकडो विद्यार्थी संपगाव येथील हायस्कूल आणि कॉलेजमध्ये रोज येतात. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बस व्यवस्था नसल्यामुळे एकाच बसमधून तब्बल १०० ते १५० हून अधिक विद्यार्थ्यांना अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा विनंती करूनही कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत बैलहोंगल आगाराच्या व्यवस्थापकांनी, विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून लवकरच अतिरिक्त बसची सोय करण्यात येईल, असे आश्वासन दूरध्वनीवरून दिले आहे.

परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेले हे आश्वासन केवळ कागदावरच राहते की विद्यार्थ्यांच्या या समस्येतून खरोखरच सुटका होते, हे आता पाहावे लागेल.

Tags: