Belagavi

बेळगावात औद्योगिक क्रांतीला प्राधान्य द्यावे: लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची वाढ अत्यंत आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमीन उपलब्ध करत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवी गती देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी दर्शवला.

सांबरा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी बेळगावातील बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी जास्तीत जास्त उद्योग येण्याची गरज अधोरेखित केली. उद्योगांसाठी जमिनीची कमतरता असली, तरी शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करूनच जमीन संपादन प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या यशाचा उल्लेख करत, या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी मदत झाल्याचे केंद्रीय आयोगाने मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव हे राज्याची दुसरी राजधानी असून येथील हवामान उद्योगांसाठी पूरक आहे. आगामी काळात उत्तर कर्नाटकच्या विकासाला मुख्यमंत्री विशेष प्राधान्य देतील आणि बेळगाव जिल्ह्याला आणखी किमान दोन मंत्रीपदे मिळतील, असा विश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

Tags: