Belagavi

हिंडलगा कारागृहात सावरकरांचे छायाचित्र लावण्याची श्रीराम सेनेची मागणी

Share

बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र प्रस्थापित करावे या मागणीसाठी आगामी १३ जुलै रोजी श्रीराम सेनेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बुधवारी बेळगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद मुतालिक बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटका दिनाचे औचित्य साधून १३ जुलै रोजी हिंडलगा कारागृहाबाहेर सावरकरांचे छायाचित्र ठेवून सरकारला निवेदन सादर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सावरकरांच्या प्रतिमेसह कारागृहात नामफलक लावावा, त्यांची जयंती साजरी केली जावी, विमानतळावर नामफलक लावावा आणि शालेय पाठ्यपुस्तकात सावरकरांच्या जीवनपटाचा समावेश करावा, अशी मागणी सरकारकडे केली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमान कारागृहात पाठवताना त्यांनी समुद्रात घेतलेली उडी हा ऐतिहासिक क्षण होता, तसेच तत्कालीन सरकारने १९५० मध्ये सावरकरांना तीन महिन्यांसाठी हिंडलगा कारागृहात स्थानबद्ध केले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

काँग्रेस सरकार कधीही क्रांतीकारकांच्या पाठीशी उभे राहिले नाही, असा आरोप प्रमोद मुतालिक यांनी केला. सरदार वल्लभभाई पटेल आणि सावरकर यांना त्यांनी कधीही पुढे आणले नाही. तत्कालीन काँग्रेस सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव केला आणि त्यांच्या निधनानंतर दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी जागाही दिली नाही. आता मात्र ते बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रमोद मुतालिक यांनी दिली.

या वेळी व्यंकटेश शिंदे, विनय आंब्रोळी, बाळू पवार, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह श्रीराम सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: