बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने बेळगावकरांवरील पाणी टंचाईची भीती टळली आहे.


अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचलेला हा जलाशय आता ३० टक्के भरला असून शहरावरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. बेळगाव शहराचा मुख्य स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयात यंदाच्या उन्हाळ्यात पाणीसाठा कमालीचा घटला होता. प्रशासनाला मृत साठा (डेड स्टोरेज) वापरण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील चांगल्या पावसामुळे राकसकोप जलाशयात पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे.


सुमारे अर्धा टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या २८ फूट उंच जलाशयात सध्या जवळपास ८ फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आणखी सात ते आठ दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास जलाशय पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे. सध्या या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे शहराचा पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत राहणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Recent Comments