बेळगावमधील एकूण १८ मतदारसंघांमध्ये आजपासून मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी स्वतः आमदारांच्या निवासस्थानी भेट देऊन अर्ज सुपूर्द करत या विशेष मोहिमेचा प्रारंभ केला.

बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार यादी पुनरिक्षणाचे हे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. आणि उपआयुक्त उदयकुमार तळवार यांनी आमदार आसिफ सेठ यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली. तेथे त्यांना अर्ज सुपूर्द करून या ऑनलाईन प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली. या वेळी अधिकाऱ्यांनी अर्ज भरण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली.

जिल्हाभरात एकूण ४ हजार ५२५ बीएलओ अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घराला भेट देऊन ही एसआयआर प्रक्रिया राबवत आहेत. बेळगाव हा सीमावर्ती भाग असल्याने महाराष्ट्र आणि गोव्यासह इतर राज्यांतून विवाह करून आलेल्या महिलांची नावे कोणत्याही कारणास्तव मतदार यादीतून सुटू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक दक्षता घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने सर्व पात्र नागरिकांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी बीएलओ सक्रियपणे कार्यरत आहेत.
या प्रसंगी काँग्रेस नेते अमान सेठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments