बिदर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पत्नीची एका सैनिकाने लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. हत्येचा हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील बोळेगाव येथील रहिवासी आणि लष्करातील जवान भगवंत ज्ञानेश्वर असे पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह बिदर तालुक्यातील होन्नीकेरी गावातील संजना (२६) हिच्यासोबत झाला होता. सध्या हे दांपत्य बिदर येथील शिवनगर भागात राहत होते. मात्र, भगवंतचे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. या अनैतिक संबंधाची माहिती पत्नी संजना हिला मिळताच दांपत्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले होते. याच कारणावरून पत्नीचा काटा काढण्याचा कट रचून, माहेरी जाण्याचे सांगत पतीने तिला दुचाकीवरून सोबत नेले.

माहेरी जात असताना वाटेत भालकी तालुक्यातील गायबमुख मंदिराजवळील होन्नीकेरी जंगलात त्याने संजना हिच्या डोक्यावर आणि मानेवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. इतकेच नव्हे तर हे भयानक कृत्य अपघातासारखे दिसावे यासाठी त्याने बनाव रचला होता. गंभीर जखमी झालेल्या संजना यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या बिदर जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर मृत महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. या घटनेप्रकरणी धन्नूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.


Recent Comments