Belagavi

बेळगावात वटपौर्णिमा उत्साहात; पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींचे विशेष व्रत

Share

बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज वटपौर्णिमेचा उत्साह दिसून आला. सुवासिनींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी पारंपरिक पद्धतीने वटसावित्री व्रत केले. बेळगाव शहरातही महिलांनी अत्यंत उत्साहात या व्रताचे आचरण केले.

बेळगाव शहर आणि परिसरातील अनेक भागात आज वटसावित्री व्रताची लगबग पाहायला मिळाली. शहरातील राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिर, आरटीओ रोडवरील सोन्या मारुती मंदिर आणि हरिद्रा गणेश मंदिरासह इतर भागात पहाटेपासूनच सुवासिनींची गर्दी झाली होती. वडगाव, शहापूर, खासबाग या भागांसह ग्रामीण भागातही महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून वडाच्या झाडाला सूत गुंडाळले आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

या व्रताला मोठी पौराणिक पार्श्वभूमी आहे. सावित्रीने आपल्या पतीभक्तीच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते, अशी मान्यता आहे. त्रिमुर्तींचे रूप असलेले वडाचे झाड ज्याप्रमाणे दीर्घकाळ भक्कम उभे राहते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य आणि सौभाग्य वाढावे, या भावनेने हे पूजन केले जाते.

शहरातील सुप्रसिद्ध कपिलेश्वर मंदिरातही वटपौर्णिमेनिमित्त पूजेचे धार्मिक विधी पार पडले. मंदिरात दाखल झालेल्या महिलांनी वडाच्या झाडाला सूत गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या. यावेळी सुवासिनींनी पाच प्रकारची फळे आणि ओटीचे साहित्य अर्पण करून पूजा केली आणि एकमेकींना सणाच्या शुभेच्छा दिल्या.

पूर्वजांनी सुरू ठेवलेली ही परंपरा आजची पिढीही भक्तीभावाने पुढे चालवत आहे. दिवसभर उपवास केल्यानंतर सुवासिनी संध्याकाळच्या पूजेनंतर आपले वटसावित्री व्रत पूर्ण करणार आहेत, असे पूजेत सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले.

Tags: