विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंग आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी असलेल्या कथित व्यावसायिक संबंधांचे आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. धर्मस्थळ येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले.


निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या प्रकारामुळे आपल्याला आणि पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना तीव्र दुःख झाले असल्याचे सांगत विजयेंद्र यांनी या प्रकरणावर भाष्य केले. आपण भावनीक व्यक्ती असल्यानेच सत्य समोर यावे यासाठी धर्मस्थळ येथे येऊन शपथ घेण्याची भाषा केली होती, असे त्यांनी नमूद केले. मात्र, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा विषय आपापसात सोडवण्याचा सल्ला दिल्याने शपथेचा निर्णय मागे घेऊन आपण केवळ दर्शनासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आपल्याच पक्षातील काही लोकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना विजयेंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी आपले कोणतेही राजकीय किंवा व्यावसायिक संबंध नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण क्रॉस व्होटिंगला सहयाेग केल्याचा केला जाणारा प्रचार पूर्णपणे खोटा असून मंजुनाथ स्वामींच्या सान्निध्यात उभे राहून आपण हे सांगत आहोत, असे प्रतिपादन बी. वाय. विजयेंद्र यांनी केले. तसेच आपण केवळ मुख्यमंत्री पदाचा योग्य तो सन्मान राखत असल्याचे सांगत आपल्याविरोधात प्रचार करणार्यांचेही देव भले करो, असे त्यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत एक खासदार, आठ आमदार आणि दोन विधान परिषद सदस्य उपस्थित होते.


Recent Comments