Ramdurg

सिंचन योजनांच्या अंमलबजावणीसाठी रामदुर्गमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात प्रलंबित सिंचन योजनांसाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसीरू सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गोडची ते सालाहळ्ळी दरम्यान भव्य रॅली काढत राज्य महामार्ग रोखून धरला.


रामदुर्ग तालुक्यातील वीरभद्रेश्वर आणि सालापूर उपसा सिंचन योजना तातडीने कार्यान्वित कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील प्रसिद्ध गोडची वीरभद्रेश्वर मंदिरापासून सालाहळ्ळी गावापर्यंत शेतकऱ्यांनी भव्य निषेध रॅली काढली. शेतकरी संघटनेचे गौरव अध्यक्ष शशिकांत गुरुजी आणि राज्य अध्यक्ष चुनप्पा पुजारी यांच्या थेट नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

या रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सालाहळ्ळी गावाजवळ शेतकऱ्यांनी बेळगाव – बागलकोट राज्य महामार्गावरच ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गेल्या अनेक दशकांपासून सिंचन योजनांसाठी सातत्याने लढा देऊनही सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी केवळ पोकळ आश्वासने देऊन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला.

महामार्ग रोखल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कित्येक तास विस्कळीत झाली होती. संबंधित मंत्र्यांनी तातडीने आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन दिले नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Tags: