काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे राज्याची तिजोरी रिकामी होईल, या भाजपच्या आरोपाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बागलकोटमध्ये समाचार घेतला असून गरिबांच्या कल्याणासाठी राबवलेल्या या योजनांची त्यांनी पाठराखण केली.

बागलकोटमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप सुरुवातीपासूनच गॅरंटी योजनांच्या विरोधात आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजस्थानमधील भाषणात या योजनांमुळे राज्य दिवाळखोरीत निघेल असे म्हटले होते. मात्र, केवळ भौतिक पायाभूत सुविधा म्हणजे विकास नसून, सर्वसामान्य माणसाची आर्थिक शक्ती वाढवणे हा देखील विकासाचा मुख्य गाभा आहे, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.

आमच्या गॅरंटी योजना कोणत्याही एका विशिष्ट वर्गासाठी नसून त्या सर्वधर्मीय गरिबांसाठी आहेत. सामाजिक क्षेत्रातील ही गुंतवणूक भविष्यासाठी महत्त्वाची आहे, हे भाजपला समजायला हवे. बागलकोट आणि दावणगेरे या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात त्यांनी मुच्चखंडी येथील दुर्गादेवी मंदिरात विशेष पूजा केली आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली.


Recent Comments