मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या एका नायजेरियन नागरिकाने बागलकोटच्या एका महिलेची ५ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी मुंबईतून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी दिली. गेल्या वर्षी इळकल पोलीस ठाण्यात या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. इळकल शहरातील सुक्षिता नावाच्या महिलेची फसवणूक झाली होती. मॅट्रिमोनी साइटवर ‘सत्य अमित’ या बनावट नावाने आरोपीने महिलेशी संपर्क साधला आणि तिचा मोबाईल नंबर घेतला. आरोपीचे खरे नाव ऑलिव्हर उग्वो ओकिचिक्वू (४७) असे आहे.

आरोपीने महिलेला सांगितले की, ‘मी भारतात येत आहे आणि माझ्यासोबत एक कोटी रुपये (अमेरिकन डॉलरमध्ये) आणले आहेत. विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील’, असे सांगून त्याने महिलेकडून ५,५५,००० रुपयांची मागणी केली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने सर्व खाती बंद केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला मुंबईतील शिवाजीनगर येथील एका अपार्टमेंटमधून अटक केली. आरोपीने ज्या मोबाईल क्रमांकावरून पैसे स्वीकारले होते, तो शोधून पोलिसांनी ही कारवाई केली.


Recent Comments