Bagalkot

कर्नाटकातील आत्मनिर्भरतेची गाथा देशभर पोहोचणार..!

Share

बागलकोट जिल्ह्यातील गुळेदगुड्ड तालुक्यातील काटेगेरी ग्रामपंचायतीच्या ‘चामुंडेश्वरी संजीवनी महिला संघ’ या गटाने आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून देत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या ‘आत्मनिर्भर संघटना’ पुरस्कारासाठी या महिला संघाची निवड झाली आहे.

या संघात १४०० कुटुंबांचा समावेश असून, त्यांच्या १२० स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांनी गरिबी आणि निरक्षरतेवर मात करत स्वयंरोजगाराची नवी दिशा पकडली आहे.

केवळ २० रुपयांच्या बचतीपासून सुरू झालेल्या या महिला संघाची आज २ कोटींपेक्षा अधिक उलाढाल आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी अनेक रोजगारांना सुरुवात केली आहे. यात स्व-रोजगार कौशल्य प्रशिक्षण, परिक्रमा निधी, सामुदायिक भांडवल निधी आणि इतर निधींचा समावेश आहे. एकूण २५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन महिलांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. या महिलांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर कुरेर यांनी या संघाच्या कार्याची प्रशंसा केली आहे. त्यांच्या मते, “महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.” असे कौतुकास्पद पत्र त्यांनी संघाला दिले आहे. या संघाच्या प्रमुख सदस्या १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारतील, ज्यामुळे त्यांच्या यशोगाथेची गाथा देशभरात पोहोचेल.

Tags: