Bagalkot

तिरंगा विणणाऱ्या कामगारांवर स्वातंत्र्यानंतरही हलाखीचे जीवन जगण्याची वेळ

Share

स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा उत्साह देशभरात पसरला आहे. परंतु, देशाच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला विणणाऱ्या महिला विणकरांचे जीवन मात्र हलाखीचे आहे. इतकी वर्षे उलटूनही त्यांना योग्य मजुरी मिळत नाही, ज्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागत आहे.. त्यांच्या या संघर्षाचा आढावा घेऊयात या पुढील वृत्तांतातून..

१५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होतो. आज भारत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. १५ ऑगस्टला देशभरात तिरंगा फडकवून त्याला अत्यंत शिस्तीने मानवंदना दिली जाते. भारताची ओळख दर्शवणाऱ्या केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगांच्या ध्वजाची निर्मिती करणाऱ्या महिलांचे जीवन मात्र अजूनही सुधारले नाही. बागलकोट जिल्ह्यातील तुळसीगेरी गावात असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये, गेल्या २१ वर्षांपासून महिला हातमागावर राष्ट्रध्वजाचे कापड विणत आहेत. मात्र, देशभक्तीच्या गप्पा मारणारे राजकारणी आणि राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे करणारे नेते या विणकरांच्या दुःखाकडे लक्ष देत नाहीत. एक मीटर राष्ट्रध्वजाचे कापड विणल्यावर त्यांना केवळ ३२ रुपये मजुरी मिळते. दिवसाला ६ मीटर कापड विणले तरी घर चालवण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत. मुलांचे शिक्षण, लग्नकार्य यांसारख्या कामांसाठी त्यांना कर्ज काढणे भाग पडत आहे.

अनेकदा विनंती करूनही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही. कमी मजुरीमुळे निराश झालेल्या अनेक महिलांनी हे काम सोडून इतर नोकऱ्या शोधल्या आहेत. दिवसभर काम करूनही मजुरी कमी मिळत असल्यामुळे त्यांचे जीवन फक्त संघर्षाने भरलेले आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकारने या विणकरांच्या मदतीला धावून जाणे आवश्यक आहे. त्यांना योग्य मजुरी देऊन त्यांच्या कुटुंबांना सन्मानाने जगण्याची संधी द्यायला हवी. देशभक्तीच्या गप्पा मारण्याआधी देशाचा मानबिंदू विणणाऱ्या हातांना योग्य सन्मान आणि मोबदला मिळतो आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे.

Tags: