Uncategorized

बेळगाव: मोदी सत्तेत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता – खासदार जगदीश शेट्टर

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात उघड झाल्यानंतर, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर निर्णायक कारवाई केली अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला. सैनिकांना पूर्ण अधिकार देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आले आहे. मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची पातळी गाठली होती. मोदी खूप चाणाक्ष आहेत. त्यांना कोणत्या परिस्थितीत काय करायचे हे चांगले माहीत आहे. पाकिस्तानला त्यांनी योग्य उत्तर दिले आहे. डिवचल्यास पाकिस्तानला संपवून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.

संतोष लाड यांच्या मोदींवरील टीकेवर बोलताना शेट्टर म्हणाले, त्यांनी आपली आणि मोदींची तुलना करून पाहावी. काँग्रेसच्या काळातच काश्मीरचा काही भाग गमवावा लागला. चीननेही काँग्रेसच्या काळातच काही भाग गिळंकृत केला.

ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्धविराम झाला, असा काँग्रेसचा दावा खोटा ठरला आहे. ट्रम्प यांनीच सैन्याचे कौतुक केले आहे. सिद्धरामय्याही सैन्याचे कौतुक करतात, पण नेतृत्त्व मोदींचे होते. शशी थरूर यांनीही आपण मोदींसोबत असल्याचे सांगितले आहे. पण, संतोष लाड केवळ टीका करतात. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का, या प्रश्नावर शेट्टर म्हणाले, त्यांना आवडणारे प्रश्नच विचारा, नावडणारे प्रश्न विचारल्यास ते असेच उत्तर देतात.

कोत्तूर मंजुनाथ यांच्या चार विमानांशिवाय काहीच केले नाही, या वक्तव्यावर शेट्टर म्हणाले, ते क्षुल्लक बोलतात. कोल्हारमध्ये अस्तित्व नसलेला माणूस देशाबद्दल बोलतो. शशी थरूर यांच्या वक्तव्यावर ते काय बोलणार, असा सवाल त्यांनी केला.

बेळगावला विमानसेवा वाढवण्याबाबत शेट्टर म्हणाले, मी नियमितपणे अधिकाऱ्यांशी बोलतो आहे. स्टार एअर आणि इंडिगो अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. ‘उडान’ योजनेशिवाय नवीन शहर जोडणी सुरू करण्यास इंडिगो तयार आहे. बंगळुरू विमान जवळपास पूर्ण भरलेले असते. आणखी दोन-तीन कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत.

बेळगाव-बंगळुरू वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होईल. मोदी व्हर्च्युअल माध्यमातून या रेल्वेला हिरवा कंदील दाखवतील. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. हे राज्य गृहमंत्रालयाचे अपयश आहे. सिद्धरामय्या सत्तेचा आनंद घेत आहेत, तर डी.के. शिवकुमार यांना लवकर मुख्यमंत्री व्हायचे आहे. राज्यात बलात्कार आणि खुनासारख्या घटना सामान्य झाल्या आहेत. बंगळुरूत भ्रष्टाचाराचा कहर आहे. प्रत्येक कामासाठी पैसे मोजावे लागतात.

विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. कंत्राटदारांना विचारून पाहा, ते आत्महत्येच्या मार्गावर आहेत. कृष्णा अप्पर बँक प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपये लागतील. उत्तर कर्नाटकातील समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. दोन वर्षांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्याची सरकारची योजना आहे, पण जनता त्रस्त असताना ते कोणता उत्सव साजरा करणार आहेत, असा सवाल शेट्टर यांनी केला.

Tags: