बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील सावळगी गावात क्रिकेट बॉलच्या वादातून एका युवकाने शिक्षकावर बिअरच्या बाटलीने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गावातील खाजगी शाळेतील शिक्षक राम पुजारी आणि पवन जाधव नावाचा युवक यांच्यात दोन दिवसांपूर्वी क्रिकेट बॉलवरून वाद झाला होता. याच कारणामुळे पवनने शिक्षक पुजारी यांच्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक राम पुजारी बॉल घेण्यासाठी गेले असता, त्यांची पवनसोबत बाचाबाची झाली. या वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात युवकाने शिक्षकाला धमकी दिली. दोन दिवसांनंतर पवन पुन्हा शाळेत आला आणि माफी मागण्याच्या बहाण्याने शिक्षकासमोर उभा राहिला. बोलता बोलता अचानक त्याने बिअरची बाटली फोडली आणि तिच्या काचेने शिक्षकावर तीन-चार वेळा वार केले. त्यानंतर तो फरार झाला.
शिक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या चेहरा, खांदा आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी युवक पवनला अटक केली आहे. सावळगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments