गोव्यातील प्रसिद्ध लैराईदेवीच्या वार्षिक यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.

गोव्याच्या शिरगाव येथील श्री लैराईदेवी मंदिरात शुक्रवारी वार्षिक जत्रेला सुरुवात झाली. पार्वती देवीचा अवतार मानल्या जाणाऱ्या लैराईदेवीच्या दर्शनासाठी गोव्याच्या विविध भागांतून आणि राज्याबाहेरून हजारो भाविक येथे आले होते.

परंतु अपेक्षेपेक्षा खूपच अधिक गर्दी झाल्याने मंदिर परिसरात भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरवर्षी होणाऱ्या या जत्रेतील ‘दोंडाची यात्रा’ ही प्रमुख आकर्षण ठरते. याच यात्रेदरम्यान आज पहाटेपासूनच हजारो भाविक मंदिरात जमा झाले होते, ज्यामुळे एकाच वेळी मंदिरात चेंगराचेंगरी निर्माण झाली.
दुर्घटनानंतर पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ हस्तक्षेप करत जखमींना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले असून, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारीचे उपाय करण्याचे सरकारने सांगितले आहे.


Recent Comments