पावसाळा आला कि बेळगाव शहरातील विकासकामांचे पितळ उघडे पडते. बेळगावमधील कपिलेश्वर मंदिराला जोडणाऱ्या कपिलेश्वर उड्डाणपुलाची अवस्थाही दयनीय झाली असून पुलावरील रास्ता खचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कपिलेश्वर उड्डाणपुलावरून दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. बसस्थानक, रेल्वेस्थानक येथून येणाऱ्या नागरिकांचीही दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या श्रावणमास सुरु असून बेळगावमधील प्रसिद्ध दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थानात सुद्धा भाविकांची वर्दळ वाढत आहे. इतकेच नाही तर बेळगावच्या श्री गणेशोत्सवानिमित्त निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीतील गणेशमूर्तींची वाहने देखील याच उड्डाणपुलावरून जातात. या भागात येण्यासाठी या पुलाचा आधार घ्यावा लागतो. मात्र पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येथील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्याची दखल प्रशासन, मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी, अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.


या पुलावरून दररोज ये जा करणाऱ्या वाहनधारकांनीही नाराजी व्यक्त केली असून गेल्या ५ वर्षात पुलावरील रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रयत्नच करण्यात आल्याची तक्रारही केली आहे. बेळगाव हे केवळ नावापुरतेच स्मार्ट असून पुलावरील रस्तेच नाही तर या भागातील ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधांसंदर्भातील समस्यांनी नागरिकांना ग्रासले असून अधिकारी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
कपिलेश्वर उड्डाणपुलावरील रस्ता गणेशोत्सवापूर्वी दुरुस करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी उचलून धरली असून याकडे प्रशासन कशापद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Recent Comments