Belagavi

उत्तर कर्नाटकातील जनतेच्या मागण्यांना नेहमीच पाठिंबा : अभिनेते अभिषेक अंबरीश

Share

उत्तर कर्नाटकातील जनतेचे आपल्यावर आणि आपले त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील असे कन्नड चित्रपट अभिनेते अभिषेक अंबरीश यांनी सांगितले.

बेळगावात मंगळवारी ‘बॅड मॅनर्स’ कन्नड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चित्रपट अभिनेते अभिषेक अंबरीश म्हणाले की, आम्हा चित्रपट कलाकारांना, आमच्या चित्रपटांना उत्तर कर्नाटकातील जनतेचे नेहमीच प्रेम, प्रोत्साहन मिळत आले आहे. येथील अनेक लोक आम्हाला बेंगळूर, म्हैसूर येथे आमच्या घरी येऊन भेटतात. आम्हाला भेटल्यानंतर त्यांना अतीव आनंद होतो. तसाच आनंद आम्हाला चाहते भेटल्याने होतो.

पण कदाचित त्यामुळेच चित्रपट कलाकार या भागात जास्त येत नसावेत. कावेरी, म्हैसूर, बेंगळूर म्हटले की, आम्हाला तेथे एक व्यासपीठ उपलब्ध होते. संपर्काचा अभाव हेही एक कारण आहे. पण कावेरीच्या लढ्यात जसे आम्ही सहभागी होतो, तसेच म्हादईसाठीच्या लढ्यातही आम्ही सहभागी होऊ, त्या लढ्याला पाठिंबा देऊ. यापूर्वी डॉ. राजकुमार, अंबरीश यांच्यासारखे अनेक चित्रपट अभिनेते बेळगावात येऊन गेलेत. उत्तर कर्नाटकातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आम्ही जरूर आवाज उठवू. कोणत्या समस्या आहेत त्याची माहिती द्यायला हवी असे ते म्हणाले.

आमची कर्नाटकाची भाषा, संस्कृती आणि परंपरांच्या रक्षणाची जबाबदारी आमचीही आहेच. यासाठीच केवळ दक्षिणच नव्हे तर उत्तर कर्नाटकाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आवाज उठवू असे अभिषेक अंबरीश यांनी सांगितले. राजकीय प्रश्नांवर उत्तर देण्यास नकार देत राजकारण पाचशे किमीवर, मंड्यामध्ये आहे असे विनोदी उत्तर त्यांनी दिले. ‘बॅड मॅनर्स’ हा एक उत्कृष्ट कथेवर आधारित सुंदर चित्रपट आहे. प्रेक्षकांनी तो जरूर बघावा असे आवाहन त्यांनी केले.

Tags: