देश आणि हिंदू धर्मासमोरील समस्या सोडविण्यासाठी देशवासीयांच्या विशेषतः युवकांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शौर्य रथयात्रा काढली आहे अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री स्तानु मलाईन यांनी दिली.

बेळगावात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विहिंपचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री स्तानु मलाईन म्हणाले की, हिंदू धर्माच्या रक्षणाचा उदात्त हेतू समोर ठेवून विश्व हिंदू परिषदेची 1964 मध्ये स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर विहिंपने राम जन्मभूमी आंदोलनासह हिंदूंच्या अनेक आंदोलनात सक्रिय भाग घेतला आहे. आता स्थापनेच्या 60 वर्षपूर्तीनिमित्त विहिंपच्या युवा शाखेच्या सहयोगाने देशभर शौर्य रथयात्रा काढण्यात येत आहे.

सध्याच्या परिस्थितीत हिंदू धर्म आणि हिंदू समाजासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी हिंदू समाजात विशेषतः हिंदू युवकांमध्ये व्यापक जागृती करणे हा या यात्रेचा हेतू आहे. 20 सप्टेंबरपासून देशव्यापी रथयात्रेला प्रारंभ झाला असून, 26 सप्टेंबरपासून कर्नाटकात शौर्य रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकारने गोहत्या बंदी कायदा, धर्मांतर बंदी कायदा असे महत्वाचे कायदे मागे घेऊन हिंदुविरोधी धोरण पत्करले आहे. त्याविरोधात या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विहिंपचे बेळगाव जिल्हा कोषाध्यक्ष कृष्ण भट यांनी शौर्य रथयात्रेच्या बेळगाव जिल्ह्यातील संचाराबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तर कर्नाटकातील 17 जिल्ह्यांत शौर्य रथयात्रा काढण्यात येत असून, 7 रथांद्वारे त्याचा प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, बेळवडी मल्लम्मा अशा क्रांतिकारकांच्या ठिकाणी जाऊन रथयात्रेद्वारे त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
चिक्कोडी भागातील रथयात्रा पूर्ण झाली असून, उद्या सकाळी रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ्ळ येथून रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. तेथून सौंदत्ती तालुक्यातील बेळवडी मल्लम्मा, बैलहोंगल तालुक्यातील चन्नम्मा कित्तूर आणि संगोळ्ळी रायण्णा येथे रथयात्रा जाईल. 9 सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात शौर्य रथयात्रेच्या आगमन होईल. आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काकतीवेस मार्गे शहरातील विविध मार्गांवरून रथयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर पिरनवाडी येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
त्यानंतर मजगाव येथून बेळगाव तालुक्यातून रथयात्रा खानापूर तालुक्याकडे कूच करेल. खानापूर शहरात फिरून रथयात्रा संगोळ्ळी रायण्णा यांच्या नंदगड येथील स्मारकाला भेट देईल. तेथे संगोळ्ळी रायण्णा यांच्या स्मारकाला नमन करण्यात येऊन जिल्ह्यातील रथयात्रेच्या सांगता होईल. रथयात्रेदरम्यान गावोगावी विहिंप-बजरंग दल प्रवेश मोहीम राबविण्यात येणार आहे. रामभक्त हनुमानाची भव्य मूर्ती रथावर आरूढ असेल असेही भट यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत विहिंप जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, शहराध्यक्ष भावकाण्णा लोहार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments