गाव करेल ते राव काय करेल? अशी एक म्हण मराठीत आहे. बेळगावजवळील महाराष्ट्राच्या सीमेतील चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी ग्रामस्थांनी ती खरी करून दाखवलीय. येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील सुमारे पाचशे ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली.
बेळगाव परिसरातील उचगाव, बेळगुंदी, कुद्रेमनी, कंग्राळी, कडोली, काकती तसेच बेळगाव महाराष्ट्र सीमेवरील अनेक खेड्यांत प्राचीन ग्रामीण संस्कृतीतील पावणेर पद्धत अजूनही अधूनमधून पाळली जाते. संपूर्ण गावाने अथवा व्यक्तींच्या समूहाने एखाद्याचे शेतीचे वा तत्सम काम करून द्यायचे, ज्याचे काम आहे त्याने त्या सगळ्यांना जेवण द्यायचे आणि दुसऱ्यांच्या कामात सहभागही द्यायचा अशी साधारण ही पद्धत.
चंदगड तालुक्यातसुद्धा ही प्रथा आहे.
तेऊरवाडी येथील श्री ब्रम्हदेव देवस्थान कमिटीच्या ताब्यात पाच एकर हुलकाई देवीचे शेत आहे. यापूर्वी हे शेत खंडाने विविध शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिले जात होते. पण सध्या या परिसरात गव्यांच्या वाढता वावर, शेतीचा वाढता खर्च व शेतमजुरांची कमतरता यामूळे शेत करण्यास कोण तयार होत नव्हते.
यानंतर देवस्थान कमिटीने गावच्या श्रमदानातून ही शेती कसण्याचा गतवर्षी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली. पुन्हा गावामध्ये पाळक करून संपूर्ण गावातील प्रत्येक घरातील स्त्री, पुरुष, युवक यांच्या सहकार्यातून रोप लावण करण्यात आली. यासाठी आदी बैलांच्या साह्याने चिखल करण्यात आला. काहीनी रोप काढली तर काहीनी भाताच्या पेंड्या पुरवल्या, दोघा-तिघानी वरखत टाकले. काहीनी शेतात पाणी पुरवण्याचे तर महिलांनी तरु काढून तीची लागण करण्याचे काम केले.
एकमेकांच्या सहकार्यातून पारंपारिक लोकगीते गात अवघ्या तीन तासातच रोपलागन संपवण्यात आली. एकीचे बळ सर्व श्रेष्ठ असल्याचे या घटनेतून दिसून येते.
शेवटी एकत्रित पणे मांसाहारी व शाकाहारी जेवणावर ताव मारण्यात आला .
पावणेरची आठवण
तेऊरवाडीत पूर्वी पावणेर करायची परंपरा होती. पावणेर म्हणजे कोणाचेही कोणतेही काम गावातील ग्रामस्थांनी जाऊन विनामूल्य करणे. फक्त याच्या बदल्यात ज्याचे काम आहे त्याने सायंकाळी सर्वांना जेवण देण्याची प्रथा होती.
यामध्ये बैलानी शेतजमिन बसवणे, गवत कापणे-आणणे, मळणे , शेण किट कालवणे, खत वढवणे, घर बांधणे, लाकडे आणणे आदि कामे विनामूल्य केली जात. पण आता माणूसकी संपुन सर्वच कामांमध्ये पैशांची देवघेव होते. त्यामुळे पावणेर हा प्रकार बंद पडला. पण तेऊरवाडीकरांनी आज पुन्हा पावणेर प्रथा जपून सर्वाना आनंदाचा धक्का दिला.
Recent Comments