Belagavi

 अभय पाटील अधिकाऱ्यांवर दाखल करणार हक्कभंग प्रस्ताव

Share

मच्छे वीजकेंद्र कोनशिला समारंभावरून आता मानापमान नाट्य रंगले आहे. स्थानिक आमदार या नात्याने आपल्याला आमंत्रण न देऊन हेस्कॉम, केपीटीसीएल अधिकाऱ्यांनी शिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

बेळगावातील उद्यमबाग, मच्छे परिसरातील उद्योजकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या 220 केव्ही वीज वितरण केंद्राला अखेर काल मुहूर्त मिळाला. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्राची कोनशिला बसवली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अभय पाटील होते. मात्र आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टाचाराप्रमाणे निमंत्रण दिले नाही, कामाचा ठेका घेतलेल्या कंत्राटदार मित्राच्या आग्रहास्तव आपण कार्यक्रमास उपस्थित राहिलो अशी माहिती त्यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना दिली.

अभय पाटील म्हणाले की, मागील भाजप सरकारच्या सत्ताकाळातच हे केंद्र आणि त्यासाठी निधी मंजूर झाला. तत्कालीन ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांना मी बेळगाव अधिवेशनात चेंबर ऑफ कॉमर्स, बेमसील आणि अन्य उद्योजक संघटनांचे प्रतिनिधींसह भेटून हा प्रस्ताव ठेवला. त्यांनी यासाठी मोठा निधी लागेल असे सांगितले. त्यावर बेळगावला उपराजधानी असे केवळ तोंडाने बोलता, विकासकामांना निधी मात्र देत नाही असे म्हटल्यावर त्यांनी प्रकल्प मंजूर केला. नंतर अर्थ खात्यात हा प्रस्ताव अडकला. त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भेटून ही बाब निदर्शनास आणली.

त्यांच्या सूचनेवरून 28 मार्चला प्रकल्प आणि त्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या दोन्ही गोष्टी आमच्या भाजप सरकारच्याच काळात झाल्या. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 29 मार्चला निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या केंद्राचा कोनशिला उभारणी समारंभ रेंगाळला. निवडणूक पार पडल्यावर प्रकल्प मंजूर केलेल्या माजी ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांना बोलावून कार्यक्रम घेण्याचा माझा विचार होता.

पण त्याला अधिकाऱ्यांनी शिष्टाचाराचा भंग होईल असे कारण दिले. त्यावर मी गप्प बसलो. पण आता नवीन सरकारच्या काळात कार्यक्रम घेताना अधिकाऱ्यांनी शिष्टाचारानुसार मला कळवून, कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता त्यांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे असा आरोप आ. अभय पाटील यांनी केला.
वीजकेंद्र उभारणीचा ठेका घेतलेले ठेकेदार माझे मित्र आहेत,

त्यांच्या आग्रहास्तव मी कार्यक्रमाला आलो आहे. अधिकाऱ्यांनी निमंत्रण देण्याची साधे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे ही कृती शिष्टाचाराचा भंग ठरते. ही कृती लोकप्रतिनिधींच्या हक्कभंग प्रकारात येते. त्यामुळे याबाबत विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.
एकंदर, बेळगावातील मच्छे वीजकेंद्र कोनशिला उभारणी समारंभावरून मानापमान नाट्य रंगले आहे. यावरून
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. आता हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

Tags: