बेळगावात झालेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावच्या ३ युवकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आज त्यांना बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

होय, १९८६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात कर्नाटकाच्या जुलमी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकूण ९ मराठी भाषिकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यात बेळगुंदीच्या तिघांचा समावेश आहे. त्यांच्या बलिदानाची वीरपताका फडकत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या त्याग, बलिदानाला सलाम करण्यासाठी आज सोमवारी, बेळगुंदी येथे या हुतात्म्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगुंदी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात समस्त बेळगुंदी ग्रामस्थ आणि महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय योगदान देत बलिदानाची परंपरा लाभलेल्या बेळगुंदी गावातील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करून, पुष्पहार व पुष्पचक्र वाहून सीमाप्रश्नी हौतात्म्य पत्करलेल्या बेळगुंदी गावच्या वीर पुत्रांना यावेळी मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, कर्नाटकाच्या भाषिक जुलमातून सीमावासीयांना मुक्त करण्यासाठी बेळगुंदी गावच्या ३ वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. एकसंघ राहून सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घेणे हीच या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल.

यावेळी अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, मनोज पावशे, विकास कलघटगी, शिवाजी शिंदे समस्त बेळगुंदी ग्रामस्थ आणि महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments