पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत आरक्षण मिळावे यासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून अथणी परिसरात पंचमसाली पिठाचे जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आणि बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.

धरणे आंदोलनात सहभागी झालेले बसवजय मृत्युंजय स्वामी म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिवेशनादरम्यान आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आतापर्यंत आमची मागणी मान्य झाली नसून पंचमसाली समाज तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १५ महिन्यांपासून आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून आगामी काळात प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येणार असून सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


स्वामीजी पुढे म्हणाले, आरक्षणासंदर्भात काही अडचणी असल्यास आपल्याला सांगाव्या असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, आंदोलन आणि राजकारण हे वेगळे आहे. आंदोलनामुळे निवडणुकीवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही. आरक्षण देण्यास विलंब झाला तर काय होईल हे हायकमांडला माहित असल्याचे स्वामीजी म्हणाले.
यावेळी शशिकांत पडसलगी, तालुका अध्यक्ष अविनाश नाईक, रमेशगौड पाटील, प्रकाश कुमठळ्ळी, धरेप्प ठक्कण्णावर, सुरेशगौड पाटील, रवी पुजारी, बसनगौडा पाटील, शिवानंद सिंधूर, मल्लप्पा हच्चीनाळ, धरेप्पा नायक, सुरेश बुकीट्टकार, विनय पाटील, मल्लकु अद्दानि, परशुराम नंदेश्वर, चिदानंद शेगुणसी, चिदानंद पाटील आदींसह शेकडोजण या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments