स्मार्टसिटी प्रकल्पात बेळगावची निवड झाल्यानंतर बेळगावकर जाम खुश झाले होते. सगळ्या नागरी समस्या सुटली आणि आपण सुखाने राहू असे त्यांना वाटले होते. परंतु अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणामुळे हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. उपनगरी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

: जिथे पाहाल तिथे कचराच कचरा, वाळून गेलेले उद्यान, खराब रस्ते, होय, तुम्ही पहात असलेले हे दृश्य आहे बेळगावातील श्रीनगरचे. येथील साई मंदिर आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस ही अव्यवस्था पहायला मिळते. त्यावरून संतापलेल्या रहिवाशांनी, आमचे श्रीनगर बेवारस झाले आहे. त्याची ना कोणाला खंत ना कोणाला खेद अशा शब्दांत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. 

स्मार्टसिटी योजनेत केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते. पण हे अनुदान कुठे खर्च केले जाते असा प्रश्न रहिवाशांनी केलाय. २ वर्षांपासून येथील बोअरवेल बंद पडली आहे. स्वच्छता येथे कधीच राखली जात नाही. स्मार्टसिटी योजनेत पथदीपांसाठी खांब उभारण्यात आले. मात्र त्याला दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. येथील अवस्था पाहता श्रीनगर बेवारस नगर झाले आहे. याबाबत आमदारांकडे तक्रार केली असता, काय करावे? कोरोना आहे असे बेजबाबदार उत्तर ते देतात अशी तक्रार समाजसेविका अखिला पठाण यांनी केली. पंतप्रधान मोदी स्वच्छ भारताबाबत भाषणे देतात. पण याठिकाणी कचऱ्याची उचलच केली जात नाही. अन्य ठिकाणचा कचरा उचलता, स्वच्छता ठेवता मग याठिकाणीच दुर्लक्ष का? दर्ग्याला जायच्या वाटेवर ड्रेनेज पाईपलाईन फुटून घाण पसरली आहे. कोणीच याकडे डोळे उघडून पहात नाही. असा भेदभाव का केला जातो? तुम्हाला मुस्लिम समाजाची मते नको आहेत का? असा सवाल करून देवस्थान, चर्च, मशिदी सर्वांकडे समान नजरेने पहा. येथील समस्या १० दिवसांत न सोडविल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिला पठाण यांनी दिला. एकंदर बेळगावात नागरी सुविधांच्या अभावी लोक खूपच त्रासले आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण लोक पेटून उठण्याआधीच अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने करायला हवे हेच या निमित्ताने म्हणावे लागेल.


Recent Comments