आपल्या शक्ती पुढे, सामर्थ्यापुढे कोणतेही अनैतिक कृत्य करणाऱ्यांची ताकद मोठी नसते, असे विचार बेळगाव कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. श्रीनाथ यांनी व्यक्त केले आहेत. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कायदा जागरूकता कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, बेळगाव, वकील संघ, जिल्हा प्रशासन, महिला आणि बालकल्याण विभाग, महिला कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमध्ये कायदा जागरूकता संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ७५ व्या स्वातंत्र्य वर्षाच्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय कायदा सुरक्षा अभियानांतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधिश ए. व्ही. श्रीनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमांच्या उद्घाटनानंतर बोलताना न्यायाधीश ए. व्ही. श्रीनाथ म्हणाले, कायद्यामध्ये अनेक महत्वाच्या बाबींचा उल्लेख आहे. आपली कर्तव्ये कोणती आहेत हे सर्व कायद्यामध्ये नमूद करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सध्या मानवी तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत असून सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांमध्ये विविध कायद्यांचा उल्लेख आहे. परंतु आपण याचा अभ्यास संपूर्णपणे केला नसून या सर्व कायद्यासंदर्भात माहिती जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य विजय देवराज अरस यांचे भाषण झाले. मानवी तस्करीच्या संदर्भात केवळ सरकार आणि अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी नसून जनतेचाही सहकार्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. यासंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. सध्या ‘यादी पे शादी’ असे प्रकार घडत असून तरुणींचे विवाह एका राज्यातून दुसऱ्या राज्यात करून त्यांच्याशी अनैतिक वर्तन केले जात असल्याच्याही गोष्टी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलांसंदर्भात प्रत्येक पालकाने काळजी घेण्याचे आवाहन विजय देवराज अरस यांनी केले.
या कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण विभागाचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, महिला कल्याण संस्थेच्या एम. एस. चौगुला, शाहीन होम्बळ आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments