बुडा अक्षयक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर बुडाचे नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुडाची पहिली बैठक पार पडली. शहरातील विविध विकास कामांच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

भाजप आमदार आणि बुडाचे माजी अध्यक्ष यांच्यातील आपसातील मतभेदामुळे गेल्या दोन वेळच्या सभा कोरमभावी तहकूब करण्यात आल्या. घोळाप्पा होसमनी यांच्या बदलीनंतर नूतन अध्यक्षपदी संजय बेळगावकर यांची निवड करण्यात आली. यानंतर आज पहिल्यांदाच बुडाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत भाजप आमदार अभय पाटील, अनिल बेनके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे मात्र या बैठकीस अनुपस्थित होते.

या बैठकीत नव्या योजना, कणबर्गी स्कीम नंबर ६१, यासह विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नव्या अपार्टमेंटमधील घरांच्या निर्मितीसंदर्भात पीएमसी नेमणूक करण्याविषयी चर्चा करण्यात आली. बुडतर्फे निर्माण करण्यात आलेल्या कुमार स्वामी लेआऊटचे मनपामध्ये हस्तांतर करणे, हॉकी क्रीडांगण निर्मिती यासंदर्भांत देखील चर्चा करण्यात आली.
विविध योजनांसह रामतीर्थ नगर येथील ग्रंथालयाचे स्नेह समाज सेवा संघाला हस्तांतर करणे, बुडाच्या योजनांमधील ११ देवराज आरसे, बसवणकुडची लेआऊट येथील अतिरिक्त जागेचा लिलाव यासहित इतर अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत असलेल्या बुडाच्या बैठकीला आज मुहूर्त लागला असून अनेक विषयांवर चर्चा देखील आज करण्यात आली आहे. बेळगावमध्ये गरिबांसाठी कमीतकमी दरात जागा मिळवून देणे आणि घरे बांधण्यासाठी लवकरात लवकर योजना आखून निर्णय घेण्यात यावेत, अशा इच्छाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.
या बैठकीला महानगर पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाली, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अनेक अधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Recent Comments