रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक उघडकीस आणून रिक्षासह तांदूळ पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बेळगावातील बॉक्साईट रोडवर घडली.

होय, सरकार गरिबांना पोट भरण्यासाठी रेशनवर मोफत तांदूळ देत आहे. मात्र हा तांदूळ गरिबांकडून विकत घेऊन काळ्याबाजारात विकण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. बुधवारी दुपारीही अशीच १४ पोती रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक एका रिक्षातून बॉक्साईट रोडवरून करण्यात येत होती. याची माहिती मिळताच हिंडलगा ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रवीकुमार कोकितकर यांनी रिक्षा थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी चालकाला नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी ही रिक्षा एपीएमसी पोलीस स्थानकात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिली. 

या संदर्भात माहिती देताना हिंडलगा ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रवीकुमार कोकितकर यांनी सांगितले की, हिंडलगा परिसरातून रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक करून ब्लॅक मार्केटमध्ये विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे रिक्षा थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी रिक्षात रेशनच्या तांदळाची १४ पोती आणि वजन करायचे मशीन आढळून आले. त्यामुळे तांदळासह ही रिक्षा एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे.
यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकारी उमा चौशट्टी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्याला भेट देऊन तांदळाची पाहणी केली. त्यानंतर यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.


Recent Comments