Belagavi

जुनी हुबळी घटनेचा तपास सरकारने मागे घेऊ नये : बेळगावात आंदोलन

Share

जुनी हुबळी येथील प्रकरणाचा तपास मागे घेतल्या प्रकरणी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बेळगावातील 12 गावातील ग्रामस्थांनी आज एकत्रित येऊन बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढला व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.

जुन्या हुबळी घटनेचा तपास एनआयएने मागे घेऊ नये या मागणीसाठी आज बेळगावात 12 गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन, धडक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आपल्या कुटुंबीयांच्या हिताची पर्वा न करता राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस परिश्रम घेत आहेत. त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. सरकारने पोलिसांना न्याय द्यावा. खऱ्या दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलक भारती चौगुले यांनी केली.

जुन्या हुबळी घटनेचा तपास एनआयएकडून मागे घेण्याचे सरकारचे धोरण निषेधार्ह आहे. पोलीस राज्यात कायदा व सुव्यवस्था राखतात. मात्र, काँग्रेस सरकारने त्यांच्यावर अन्याय करून त्यांना दूर पाठवून खुश करणे योग्य नाही. काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी केवळ अल्पसंख्याकांनीच मतदान केले नाही. तर हिंदूंसह सर्व समाज मतदान करतात हे सरकारने विसरू नये, असे विनायक नागरे म्हणाले.

जुन्या हुबळीची घटना आपण कधीही विसरू शकत नाही, लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ला झाला. मात्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे हे योग्य नाही. राज्य सरकार खटला मागे घेत आहे, हे दुर्दैव आहे. सरकारने केवळ एका समाजासाठी तुष्टीकरणाचे धोरण अवलंबणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवाजीराव शहापुरे यांनी व्यक्त केली.

यावेळी झाडशहापुर, पिरनवाडी, मच्छे, मजगाव, खादरवाडी, हुंचेनट्टी यासह 12 गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: