आधुनिक समाजातही भारतीय पारंपारिक पोशाख असणाऱ्या साडीने आपले सौंदर्य, लालित्य आणि कलात्मकता कायम ठेवली आहे. साडी नेसण्याची परंपरा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, अशी प्रतिक्रिया सुनीता पवार यांनी व्यक्त केली.

येथील शिव बसव लिंगायत सभाभवन येथे बुधवारी लिंगायत महिला समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. भारतीय स्त्री म्हटलं कि सर्वप्रथम साडीच्या पेहरावात असणाऱ्या स्त्रीचाच चेहरा आपल्या समोर येतो. साडी हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा प्राण आहे. महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी साडी आणि साडी नेसली स्त्री हि नेहमीच आकर्षक असते. भारतीय पोशाख असलेल्या साडीने परदेशी लोकही प्रभावित होत असल्याचे त्या म्हणाल्या.

लिंगायत महिला समाजाच्या अध्यक्षा सुनीता पाटील म्हणाल्या, साडी हा आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन पेहराव आहे. अनादी काळापासून आपल्या देशात साडी हा महिलांचा मुख्य पोशाख आहे. साडी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. आपल्या देशाच्या साडीला आईचे स्थान आहे, मातृत्वाची भावना असलेली साडी हे भारतमातेचे अभिमानाचे वस्त्र आहे. आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे आणि त्याचे महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी पूजा बडवाळे, प्रतिभा गुट्टीगोळी, सुधा पडेनवर, सीमा खोत, रश्मी विजापुर, लता माने आणि सुरेखा देसाई आदी महिलांनी साड्या परिधान करून रॅम्प वॉक केला. सचिव शारदा पाटील यांनी सुत्रसंचलन, सहसचिव विद्या गौडा यांनी आभार मानले. यावेळी लिंगायत महिला समाजासह अनेक महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.


Recent Comments