Belagavi

लोळसूर नवीन पुलाचे काम सहा महिन्यांत सुरू होणार : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अतिवृष्टीमुळे घटप्रभा नदीला पूर आलेल्या लोळसूर पुलाच्या दुरवस्थेचा आढावा घेतला व नवीन पुलाच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विकासासाठी कंबर कसली आहे. गोकाक शहरातील विविध भाग अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. प्रत्येक वेळी पूर आल्यावर लोळसूर पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे जनतेलाही वारंवार समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे याठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन पुलाची ब्ल्यू प्रिंट पाहून, अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. संकेश्वर-यरगट्टी राज्यमार्गावरील लोळसूर पूल खूप जुना आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी येऊन नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
त्यामुळे उंच पूल बांधण्याची गरज आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी सरकाकडून अंदाजे 40 कोटींचे अनुदान यापूर्वीच जारी करण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून सहा महिन्यांत कामाला सुरुवात होईल, असे ते म्हणाले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

Tags: