विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून तालुकास्तरावर बेमुदत संप सुरू केलेल्या ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्हास्तरावर केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्यास बेंगळुरू येथे राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीस्तव गुरुवारी बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील हा संप सुरु असून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला.
एकट्या ग्राम लेखापालांना 4 ते 5 गावांची जबाबदारी दिली जात असून पालक विभागाच्या जबाबदाऱ्यांसह 17 हून अधिक कामे ॲप आणि वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. शासनाच्या नवीन योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली जात आहे. प्रत्येक वेळी मागणी आणि समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देऊनही कोणताही फायदा होत नाही. या पार्श्वभूमीवर विविध 21 मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला निवेदन देण्यात आले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास जिल्हास्तरावर पुकारण्यात आलेला संप राज्यव्यापी करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मातृ विभागाकडे अधिक जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामप्रशासकीय अधिकाऱ्यांची पिळवणूक होत असून अधिकाऱ्यांना पायाभूत सुविधा देखील पुरविण्यात येत नाहीत. सुट्टीच्यादिवशीही कामावर रुजू होण्यासाठी आदेश दिले जात आहेत. आंतरजिल्हा बदल्या रद्द करून गाव प्रशासन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय केला जात आहे. शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या व समस्या समजून घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलक अधिकाऱ्याने सरकारकडे केली.
यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील ग्राम प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments