Belagavi

ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळी फीत बांधून व्यक्त केला निषेध

Share

तांत्रिक पद नसूनही तंत्रज्ञासंदर्भात कामकाज देऊन कर्मचाऱ्यांचा छळ केला जात आहे. ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा न देता कामासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करत आज बेळगाव तालुका ग्राम प्रशासकीय अधिकारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

आज बेळगाव शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निदर्शने करून वरिष्ठांच्या विरोधात रोष व्यक्त केला. सीसीई, नवोदय, रचना, कृषी जनगणना, आधार सीडिंग, जमीन बीट, पौथी आंदोलन, नुकसान भरपाई, हक्क पत्र, बगैर हुकूम इत्यादींसह ३० हून अधिक मोबाइल, संगणक प्रिंट स्कॅनर आणि इंटरनेट आधारित कामांसाठी ग्राम प्रशासन अधिकारी पद हे तांत्रिकदृष्ट्या बनले नाही. मात्र तरीही ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कामासाठी दबाव टाकला जात असून तशाप्रकारच्या सुविधाही सरकारकडून मिळत नाहीत. सुटीच्या दिवशीही काम करावे लागत असून तलाठ्यांच्या वापर जनावरांप्रमाणे होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना जोवर न्याय मिळत नाही, मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोवर ग्राम प्रशासकीय अधिकारी हाताला काळ्या फिती बांधून काम करतील. तोवर प्रगती अहवाल देखील दिला जाणार नाही. ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना माणुसकीने वागवा. अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलनात ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

बेळगाव तालुका ग्राम प्रशासकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, तंत्रज्ञानासंदर्भात असलेले कामकाज आम्हाला देण्यात आले असून सरकारने ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधाही दिलेल्या नाहीत. कामाचा दबाव वाढत असून यामुळे ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वाढीव कामकाजामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत असून कौटुंबिक शांतता देखील बिघडत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

ग्रामाधिकारी दिव्या कलादगी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, वरिष्ठांकडून कामासाठी दबाव आणण्यात येत आहे. या कामकाजाच्या शैलीमुळे कुटुंबियांसोबत वेळ घालवणे देखील शक्य होत नाही. आंतरजिल्हा बदली किंवा बढतीही देण्यात येत नसल्याचे त्या म्हणाल्या.

Tags: