बेळगावच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसविण्यात न आल्याने शिवशक्ती आणि भीमशक्तीने एल्गार पुकारला. अखेर या आंदोलनाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने दोन्ही महापुरुषांची शिल्प स्थानकावर स्थापन केली आहेत.
मागील दीड वर्षांपासून मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पं बसविण्यात यावीत यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि दलित संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडण्यात आले होते. अखेर या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून दोन्ही महापुरुषांच्या शिल्पांची स्थापना सन्मानपूर्वक करण्यात आली आहे. यामुळे तमाम शिवभक्त आणि भिमभक्तांमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी रेल्वेस्थानकांवरील तिकीट काउंटरच्या वरच्या बाजूला दोन्ही महापुरुषांची शिल्पं बसविण्यात आली. यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, दलित संघर्ष समिती (भीमवाद) चे रवी बस्तवाडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्त आणि भिमभक्तांच्या उपस्थितीत दोन्ही महापुरुषांच्या शिल्पांचे पूजन करण्यात आले. यावेळी रेल्वेस्थानक परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणा देत रेल्वेस्थानक परिसर दणाणून सोडण्यात आले.

गेल्या दीड वर्षांपासून गोदामात ठेवलेल्या दोन्ही शिल्पांची स्थापना करण्यात यावी, यासाठी आम्ही आंदोलन केले. आमच्या आंदोलनाला यश आले असून अखेर रेल्वे प्रशासनाने दोन्ही महापुरुषांची शिल्पं स्थापन केली याचा आम्हाला आनंद आहे, असे मत दलित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पार पडल्यानंतर दीड वर्ष सातत्याने सुरु असलेल्या लढ्याला अखेर यश आले असून दोन्ही महापुरुषांची शिल्पं स्थापन करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.


Recent Comments