Belagavi

नगरसेवक शिवाजी नाला स्वच्छतेस दिली चालना

Share

बेळगाव शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील हरिकाका कंपाउंड ते लेंडी नाला दरम्यानच्या सर्व्हिस रोड संदर्भातील समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्याबरोबरच नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी नाला स्वच्छतेला चालना दिल्याने दिलासा मिळालेल्या हरी काका कंपाऊंड येथील गॅरेज मालक, उद्योजक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शहरालगत पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हरिकाका कंपाउंड या विविध उद्योग असलेल्या वसाहतीला विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्यांमध्ये प्रामुख्याने लेंडी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे जलमय होणारे हरी काका कंपाउंड आणि या ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर चालणारे गैरप्रकार यांचा समावेश आहे. यासंदर्भात येथील गॅरेज मालक, उद्योजक आणि शेतकऱ्यांनी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत नगरसेवक मंडोळकर यांनी बुधवारी सकाळी हरी काका कंपाउंड येथे भेट देऊन पाहणी करण्याद्वारे सर्व समस्यां जाणून घेतल्या. फक्त समस्या जाणून न घेता त्यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने लेंडी नाल्याच्या सफाईचे काम देखील हाती घेतले.

यावेळी बोलताना शेतकरी नेते नारायण सावंत यांनी सांगितले की, आम्ही शेतकरी आणि या भागातील गॅरेज मालकांनी तुंबलेल्या लेंडी नाल्याबद्दल माहिती देताच नगरसेवक शिवाजी मंडोळकर स्वतः सोबत दोन जेसीबी घेऊन येथे दाखल झाले आहेत. त्यांनी गरज पडेल तेंव्हा सदर जेसीबीचा वापर करा, असे आम्हाला सांगितले आहे. या जेसीबीद्वारे सध्या आम्ही लेंडी नाल्याच्या ब्रिजच्या एका पाईपच्या ठिकाणी साचलेला गाळ कचरा काढण्याचे काम हाती घेतले आहे.

यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास मदत झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून जलमय झालेल्या हरिकांका कंपाऊंडला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाल्याच्या ठिकाणी पुलाखाली काँक्रीट बॉक्स घालण्याऐवजी पाईप घालण्याची चुकीची पद्धत अवलंबल्याने पावसाळ्यात शहरालगतच्या हरी काका कंपाउंड सारख्या परिसर जलमय होत आहे.

जर पूरसदृश्य परिस्थितीचे हे संकट कायमचे निकालात काढायचे असेल तर येथील पुलाच्या ठिकाणी पाईप ऐवजी दोन काँक्रीटचे बॉक्स घातले जावेत. ज्यामुळे पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा तर होईलच शिवाय उन्हाळ्यात हे काँक्रीट बॉक्स ये-जा करण्यासाठी वहिवासी वहिवाटीसाठी सोयीचे ठरतील. हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर त्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

Tags: