Belagavi

अपयश झाकण्यासाठी भाजपची पदयात्रा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

भाजप आणि जेडी(एस) सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पाडण्याचे स्वप्न पाहत असून केंद्र सरकार कर्नाटकातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.

मंड्या येथील जनआंदोलन कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, भाजपचे सरकार 10 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असले तरी कर्नाटकात त्यांचे योगदान शून्य आहे. आज भाजप पदयात्रेच्या नावावर आपले अपयश झाकण्यासाठी राजकारण करत आहे. भ्रष्टाचाराने पोट भरून भ्रष्टाचाराला दुसरे नाव देणारे भाजप आणि जेडीएस केवळ एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारवर विनाकारण आरोप करून जनतेच्या कारभारात अडथळा आणत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. सिद्धरामय्या यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणे सहन न होणारा भाजप-जेडीएस पक्ष आज चुकीचे आरोप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून सरकार कोणत्याही कारणाने अस्थिर होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

हासनचे माजी आमदार प्रीतम गौडा यांच्यासोबत आम्ही व्यासपीठावर येणार नाही, ज्यांनी आमच्या कुटुंबात विष पेरले त्यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होणार नाही, असे सांगणारे कुमारस्वामी प्रज्वल रेवण्णा यांच्याकडून अपमानित झालेल्या शेकडो महिलांचा विचार करत नाहीत, ते अनैतिक राजकारणी असल्याची टीकाही मंत्री हेब्बाळकरांनी केली.

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले गृहलक्ष्मी योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या पाच हमी योजना कोणत्याही कारणास्तव थांबणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी के.एच.मुनियप्पा, बोसराजू, चेलुवरायस्वामी, कृष्णा भैरेगौडा, डी. सुधाकर, रामलिंग रेड्डी, प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.

Tags: