Belagavi

आधुनिक युगात माणूस हसणे विसरत चालला आहे : प्रा. सी. एम. त्यागराज

Share

आधुनिक युगात माणूस हसणे विसरत चालला आहे, आपापसातील बंध कमी होत आहेत तसेच मैत्री देखील कमी होत आहे, अशी खंत आरसीयूचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी व्यक्त केली. अलायन्स इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशन आयोजित पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

रविवारी सायंकाळी बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये अलायन्स इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशन दिल्ली, बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व प्रसारमाध्यमातील मान्यवरांचा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज, प्रसन्नकुमार शेट्टी, डॉ. नवीन शेट्टीगार, डॉ. डी.एम. बेन्नूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधींचा माध्यमरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. सी. एम. त्यागराज म्हणाले, प्रसारमाध्यमांशी सेवा अमूल्य आहे. अतिवृष्टी, कोरोना, दुष्काळ, अपघात या काळात प्रसारमाध्यमे आपले प्राण पणाला लावून समाजाची सेवा करतात. यावेळी त्यांनी मोबाईलमुळे दुरावत चाललेल्या मैत्रीपूर्ण नात्याबद्दल विचार व्यक्त केले. आधुनिक युगात मोबाईलमुळे संपर्क जलदगतीने होत असले तरी एकमेकांशी असलेली मैत्री, रोजचे हसणे, एकत्र कुटुंबात राहूनही एकमेकांसोबत वेळ घालवणे, माणूस विसरत चालला आहे. हृदयात आणि मनात नसलेले प्रेम मोबाईलच्या स्क्रीनवर आणि स्टेटसवर दिसत आहे, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी अलायन्स बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी आनंद शेट्टी, सचिवपदी मीनल कालकुंद्रीकर, अलायन्स क्लब सांबरा विमानतळाच्या अध्यक्षपदी मारुती भोई यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा गव्हर्नर, इंटरनॅशनल चेअरपर्सन आलाय दिनकर शेट्टी यांनी शपथ देवविली.  यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष आनंद शेट्टी म्हणाले, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन ऑर्गनायझेशनचे सर्व उपक्रम यापुढील काळातदेखील सुरु ठेवण्यात येतील.

यावेळी दै. विजयवाणीचे विभागीय संपादक महेश विजापुरे, इन न्यूजचे संपादक राजशेखर पाटील, दै. हळ्ळी संदेशचे कुंतीनाथ कलमणी आदींना माध्यमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी आर. एन. तोटिगेर, प्रभाकर शेट्टी, मंदार्ती उदयकुमार शेट्टी, विजया शेट्टी आदींनी भरतनाट्यमचे सादरीकरण केले. मंदाकिनी अप्पुगोळ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी अलायन्स इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशनचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

Tags: