Belagavi

धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला दक्षतेचा इशारा

Share

संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असून खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्वत्र कडक दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.

आज बेळगावमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजापूर बॅरेजमधून दररोज 1 लाख 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कल्लोळ बॅरेजमधून हिप्परगी बॅरेजमध्ये 1.50 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. हिडकल जलाशयाची एकूण क्षमता 51 टीएमसी असून, बॅकवॉटरसह 43 टीएमसी पाणीसाठा आहे आणि दररोज 3 टीएमसी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कृष्णा चिक्कोडी, रायबाग, निपाणी कागवाडचे तहसीलदार यांच्याशी चर्चा झाली असून हुलगबळी-मंगाबस्ती, सत्ती, हल्याळ, तंगडी, शिनाळ याभागात पाणी शिरण्याची शक्यता असून, ग्रामस्थांना माहिती देण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.

कागवाड उगार, बनिजवाड येथील काही रस्त्यांचा संपर्क तुटणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहेत. घटप्रभा पाण्याची पातळी वाढल्यास हुक्केरी, गोकाक, मुडलगी तालुक्यातील काही भागात पाणी येण्याची शक्यता आहे. अंकलगीमध्ये बळ्ळारी नाल्याचे पाणी शेतात शिरण्याची शक्यता आहे. तसेच कुंदरगी आडवी सिद्धेश्वर मठात पाणी शिरण्याची शक्यता असून येथील नागरिकांना अंकली मठात स्थलांतरित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कोयना आणि काळम्मावाडी जलाशयातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांचा संपर्क तुटला असून याची माहिती घेण्यासाठी कर्नाटक सरकारचे जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी 24 तास घटनास्थळी तैनात राहणार आहेत. बेळगाव शहरातही पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित असून कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी अथणी, कागवाड, चिक्कोडी, सदलगा येथे भेट देऊन पाहणी केली. स्तवनिधी घाट येथे सुरू असलेल्या महामार्ग विकासाच्या कामादरम्यान टेकडी फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील 73 पुलांपैकी 25 पुलांचा संपर्क तुटला असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. काही ठिकाणी मगरींचा वावर वाढल्याचे दिसून आले असून कुणीही पाण्यात उतरू नये, असा इशारा देण्यात आला आहे .

जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी पाणी गरम करून प्यावे. गर्भवती महिलांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्त्याच्या संपर्कात राहावे. शाळांच्या स्थितीचा आढावा घेऊन सुटी जाहीर केली जाईल. जनावरांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन परिस्थिती कायम ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Tags: